वसई-विरार शहर महानगरपालिका दि.२७/०१/२०२६
*अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा दरवर्षी ‘उत्कृष्ट आपत्ती सेवा मा.आयुक्त गौरव पदक’ देऊन होणार सन्मान*
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात उद्भवणारे विविध पूरजन्य परिस्थिती, दुर्घटना, आगीच्या घटना इ.विविध आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. याचेच उदाहरण द्यायचे झाल्यास मागील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीच्या काळात पूरजन्य परिस्थितीत अग्निशमन विभागातील कर्मचारी यांनी विविध ठिकाणी बचावकार्य पर पाडले, पुराच्या पाण्यातून अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचविले. तसेच विरार पूर्व येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन दलातील जवानांनी एनडीआरएफ टीम च्या मदतीने सलग ४१ तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून इमारतीच्या ढिगाऱ्यातून जखमी, मयत नागरिकांना बाहेर काढले. अशा प्रकारच्या असंख्य आपत्कालीन परिस्थितीत मनपा अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आपले अतुलनीय शौर्य, कुशलता व उच्चतम कर्तव्य परायणता दाखवीत असतात.
अशा कर्तव्यदक्ष व शूर कर्मचाऱ्यांना योग्य सन्मान मिळावा, त्यांचे मनोबल वाढून त्यांना अग्निशमन व आपत्कालीन सेवा बजावण्यास प्रोत्साहन मिळावे तसेच कठीण परिस्थितीत धैर्य, निष्ठा आणि जिवाची बाजी लावून जनसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्याकरिता मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रतिवर्षी “उत्कृष्ट आपत्ती सेवा मा.आयुक्त गौरव पदक” देण्यात येणार आहे.
सदर गौरव पदक पुरस्काराकरिता शिफारस करणेकामी समिती गठीत करण्यात आली असून समितीमार्फत वर्षभरात अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांची नावे “उत्कृष्ट आपत्ती सेवा मा.आयुक्त गौरव पदक” पुरस्कारासाठी जाहीर करण्यात येतील व महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिनी अथवा इतर विशेष कार्यक्रमांच्या वेळी सदर पदक संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचा योग्य सन्मान करून प्रदान करण्यात येईल.
मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या या प्रोत्साहनपर निर्णयामुळे महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मा.आयुक्त महोदयांचे आभार मानले असून सेवा बजावताना विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी आपली उच्चतम कर्तव्य परायणता वेळोवेळी दाखवून नागरिकांचे रक्षण करतील अशी ग्वाही अग्निशमन व आपत्कालीन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी याप्रसंगी दिली.
