वसई-विरार शहर महानगरपालिका
निवडणूक विभाग
दि.२६/१२/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणास सुरुवात*
वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता दि.१५ जानेवारी २०२६ रोजी होणारी मतदान प्रक्रिया बिनचूक पद्धतीने व्हावी, यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणास दि.२६/१२/२०२५ पासून सुरुवात झाली. पहिले प्रशिक्षण शुक्रवार दि.२६/१२/२०२५ रोजी जी.जी.कॉलेज, वसई (प.) येथे सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते. मा.आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या निर्देशानुसार शुक्रवारपासून सुरु झालेल्या प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राच्या वेळी मा.अतिरिक्त आयुक्त (निवडणूक) श्री.संजय हेरवाडे, मा.उप-आयुक्त श्रीम.अर्चना दिवे, तसेच या प्रशिक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षक म्हणून लाभलेले श्री.महेश पोंक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. याचप्रमाणे दि.२७ व २८ डिसेंबर रोजीही प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
निवडणूकीत मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान प्रक्रियेसंबंधी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण उद्भवत नाही. तसेच प्रशिक्षणावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध शंकांचे निरसनही प्रशिक्षकांमार्फत करण्यात येते. प्रशिक्षणावेळी बऱ्याचशा नवीन बाबींची माहितीही मिळते. यामुळे नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित सर्व प्रशिक्षण सत्रांना उपस्थित राहून प्रशिक्षण घ्यावे, असे यावेळी मा.अतिरिक्त आयुक्त (निवडणूक) श्री.संजय हेरवाडे यांनी सांगितले.
वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी एकूण २९ प्रभाग निश्चित करण्यात आले असून या प्रभागांमध्ये एकूण १४३२ इतकी मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांसाठी ७८५० इतक्या मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, २ व ३ यांना दि.२६ ते २८ डिसेंबर २०२५ मध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणा दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांना मतदान प्रक्रियेच्या माहिती सोबतच EVM मशीन चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Hands-on Training) ही देण्यात येत आहे.
या प्रशिक्षण सत्रात संगणकीय सादरीकरणाद्वारे (PPT) प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी, मॉक पोल घेण्याची पद्धत, निवडणूक विषयक कायदेशीर तरतुदी, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना, निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी मतदारांसाठी टपाली मतदान, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूक साहित्य ताब्यात घेणे व तपासणी, साहित्य वितरण व स्वीकृती व्यवस्था, चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र तपासणी, मतदान केंद्रांची उभारणी, मतदान कक्षाची उभारणी, मतदान केंद्रांवर आदल्या दिवशी करावयाची पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर पोहोचल्यावर करावयाची कार्यवाही, मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था, मतदान केंद्राध्यक्षांच्या मतदान केंद्र परीसरातील जबाबदाऱ्या, विविध टप्प्यांवरील कामांची रूपरेषा तसेच मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही, मतदान यंत्रांची जोडणी, मॉक पोल, मतदान संपल्यानंतर करावयाची कार्यवाही इ.बाबींचा समावेश होता. याशिवाय, मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याबाबत देखील माहिती देण्यात आली.
यावेळी प्रशिक्षणासाठी आणलेल्या ईव्हीएम, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट हाताळण्याबाबत सविस्तर प्रात्याक्षिक दाखविण्यात आले व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनीही प्रत्यक्ष ईव्हीएम हाताळणी करून त्याबाबत प्रशिक्षण घेतले.


