वसई विरार शहर महानगरपालिका
निवडणूक विभाग
दि.१६/१२/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने मा.आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न*
मा.राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दि.१५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ही निवडणूक सुव्यवस्थितपणे व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुक तयारी संदर्भात विविध विषयांवर चर्चा करणे कामी मंगळवार दि.१६ डिसेंबर २०२५ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मा.आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस मा.श्री.संजय हेरवाडे अति. आयुक्त (निवडणूक), मा.श्री.दिपक सावंत अति.आयुक्त (उत्तर), उप-आयुक्त (निवडणूक), प्रभाग निहाय नियुक्त करण्यात आलेले मा.निवडणूक निर्णय अधिकारी, मा.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, प्रभाग सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निश्चिती, निवडणूक आचारसंहितेची परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना, उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र देणे व स्विकारणे, नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे, निवडणूक कामाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, मतदान केंद्रांवरील सोईसुविधा, सीसीटीव्ही व्यवस्था, मतदान यंत्र व साहित्य यांचे वाटप व स्वीकृती नियोजन, मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना, तेथील सुरक्षा व्यवस्था, मतदान शांततेत व सुव्यवस्थितपणे होण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी करावयाची कार्यवाही, अहवाल सादरीकरण, मतमोजणी बाबतचे नियोजन इ.निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणूक माहिती पुस्तिका उपस्थितांना देण्यात आली.
मा.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे व कायद्याचे तंतोतंत पालन करून महानगरपालिकेची निवडणूक योग्यरित्या पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी मा.आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांचेमार्फत उपस्थितांना देण्यात आले.
निवडणूक विभाग
वसई विरार शहर महानगरपालिका

