*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची गतिमान पद्धतीने वाटचाल सुरू*
.*...पालकमंत्री गणेश नाईक*
पालघर, दि. ४ ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन गतिमान पद्धतीने वाटचाल करत असून शासन आणि प्रशासन यांच्या प्रभावी समन्वयातून पालघर जिल्हा सुद्धा विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
रोजगार मेळावा आणि सेवा पंधरवडा उपक्रमाच्या सांगता सोहळ्यानिमित्त तसेच अनुकंपा गटातील उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पालकमंत्री गणेश नाईक बोलत होते.
प्रसंगी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, वसई-विरार महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई,तसेच जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती कालावधी मध्ये “सेवा पंधरवडा” अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत विविध शासकीय योजना राबविण्यात आल्या. त्याच अंतर्गत, अनुकंपा तत्त्वावर प्रलंबित असलेल्या हजारो उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन सर्व अनुकंप धारकांना न्याय दिला असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले, “राज्यातील सुमारे १५ हजार लोकांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय झाला असून शासनाचे हे पाऊल संवेदनशील व जनहिताचे आहे.”
श्री . नाईक यांनी पुढे सांगितले की, सचिव व्ही. राधा यांनी या उपक्रमासाठी सखोल व गतिमान पद्धतीने अभ्यास करून काम केले आहे. “त्या सत्यनिष्ठ आणि कार्यक्षम अधिकारी आहेत. अशा सत्यवादी लोकांमुळेच प्रशासनातील विश्वासार्हता वाढते,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी पालघर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा उल्लेख करताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले, “पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून, आदिवासींना वनपट्टे देण्यात जिल्ह्याचा देशात प्रथम क्रमांक आहे. वनखात्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना बांबू रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत. या बांबू लागवडीमुळे ‘सेवा विवेक’ संस्थेच्या सहकार्याने स्थानिकांना शेतीपूरक रोजगार मिळणार आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, समुद्रकिनारी असलेल्या सातपाटी, माहीम, केळवा बंदर या गावांचे सर्वेक्षण गुगल मॅपिंगच्या माध्यमातून केले जाईल. यामुळे घरमालकांना त्यांच्या जमिनीचे अचूक मोजमाप आणि मालकी हक्क निश्चित करता येतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेले “१०० दिवसांचे अभियान” आता “१५० दिवसांच्या अभियानात” रूपांतरित करण्यात आले असून, या अभियानाचा कालावधी २६ जानेवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे शासकीय कामकाज अधिक गतिमान होणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.
पालघर तहसील कार्यालयातील दिवंगत शिपाई रुपेश पाटील यांच्या पत्नीला अवघ्या ४७ व्या दिवशी अनुकंपावर नियुक्ती देण्यात आल्याचा उल्लेख करत, शासन संवेदनशीलतेने कार्य करत असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
---