वादळ "शक्ती"चा महाराष्ट्र किनारपट्टीवर धोका; प्रशासनाला सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार "शक्ती" या चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पुढील काही दिवसांमध्ये (३ ते ७ ऑक्टोबर) परिणाम होणार असल्याचा इशारा राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने दिला आहे.
या चक्रीवादळाचा प्रभाव मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील जिल्ह्यांवर अधिक प्रमाणात होणार आहे.
३ ते ५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्राच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर ताशी ४५ ते ५५ कि.मी. वेगाने वारे सुटून ते ६५ कि.मी. पर्यंत झोत घेऊ शकतात. वादळाचा तीव्रतेनुसार हा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे निरीक्षण आहे.
उत्तरेकडील किनाऱ्यावर समुद्रात तीव्र आणि उग्र लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळामुळे राज्यातील आतल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः –
पूर्व विदर्भ
मराठवाड्याचे काही भाग
उत्तर कोकण
याठिकाणी संभाव्य पुरस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन आराखडा सक्रिय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच किनारी भाग व खालच्या प्रदेशातील नागरिकांसाठी स्थलांतराची तयारी ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक सूचना म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, समुद्र प्रवास टाळावा आणि अतिवृष्टीच्या काळात सुरक्षिततेची काळजी घ्यावी.