*अभिजात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा*
*मराठी भाषा संवादाचे प्रभावी माध्यम आणि माणसांना माणसांशी जोडणारे बंधन आहे*
*....जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*
पालघर, दि. ३ ऑक्टोबर : जगातील प्रगत राष्ट्रांनी आपल्या मातृभाषेचा सन्मान जपला आणि त्याच आधारावर जागतिक पातळीवर प्रगती साधली. मराठी ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून माणसाला माणसाशी जोडणारे बंधन असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.
केंद्र शासनाने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’चा दर्जा दिल्याच्या या ऐतिहासिक क्षणाचा गौरव करत यावर्षी जिल्हास्तरावर पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे अभिजात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई, महेश सागर, शिक्षणाधिकारी (माध्य.) अशोक पाटील, साहित्यिक, कवी व गीतकार प्रसाद कुलकर्णी, हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी तसेच वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, तो क्षण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाचा क्षण होता. मी त्यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका येथे कार्यरत होते. तिथे झालेल्या अभिजात मराठी भाषा या भव्य कार्यक्रमा मध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वासासह अभिमानाची भावना दिसून आली. शासनाने हा दिवस दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी-गीतकार प्रसाद कुलकर्णी आणि हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी अभिजात मराठी भाषा दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पुढील वर्षी अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले .
---