वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत अग्निशामन सेवा सप्ताहास सुरुवात - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Wednesday, 15 April 2026

वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत अग्निशामन सेवा सप्ताहास सुरुवात


 वसई-विरार शहर महानगरपालिका 

                                                                                                                                                                दि.१४/०४/२०२६      



*वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत ‘अग्निशमन सेवा सप्ताहास’ सुरुवात*


दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक १४ ते २० एप्रिल, २०२६ या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. 

           दिनांक १४ एप्रिल, १९४४ रोजी मुंबई गोदीत एस.एस. फोर्ट स्टिकिंग या जहाजाचा स्फोट होवून लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले तसेच त्यानंतरही अग्निशमनाचे कार्य करताना प्राणांची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रतिवर्षी केंद्रीय गृह मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार संपुर्ण देशात दिनांक १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो.

मंगळवार दि.१४ एप्रिल २०२६ रोजी या सप्ताहाची सुरुवात वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या आचोळे अग्निशमन केंद्र मुख्यालय, नालासोपारा (पूर्व) येथे करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थितांमार्फत अग्निशमन दलाच्या हुतात्मांस श्रध्दांजली वाहण्यात आली व शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या स्मृती स्तंभास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली. तसेच यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मा.महापौर श्री.अजीव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर व कर्मचारी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.रोहन मोरे यांनी केली. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ विषयी माहिती देत वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळणेसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धांविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांसमोर फायरमन फायटर चॅलेंज स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आपले शौर्य प्रदर्शन सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली. सर्व उपस्थित मान्यवर व अधिकारी-कर्मचारी वर्गाकडून  या स्पर्धकांना मोठे प्रोत्साहनही मिळाले. 

यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अग्निशमन विभागाच्या शौर्याचे तसेच स्वतःच्या  जीवाची पर्वा न करता इतक्या मोठ्या शहरातील नागरिकांसाठी संकटसमयी वेळोवेळी धावून जाण्याच्या कार्याचे  कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या भाषणातून अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांचा, साहित्य पुरवठ्याचा तसेच आस्थापनेवरील विषयांची पूर्तता करणे बाबतचे विषय मांडण्यात आले. या विषयांबाबत  उपस्थित मा.महापौर, मा.आयुक्त तसेच उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक चर्चा करून अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय लवकरात लवकर घेतले जाणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी अग्निशमन विभागाने आयोजित केलेल्या या उत्तम कार्यक्रमाबाबत सर्व मान्यवरांनी अग्निशमन विभागाचे अभिनंदन केले. 

अग्निशमन विभागामार्फत क्रिकेट, रस्सीखेच सारख्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामधील  विजेत्यांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरव करण्यात आला. यानंतर अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक व पारंपारिक अग्निशमन साहित्य व यंत्रांच्या प्रदर्शनाला उपस्थित मान्यवरांनी भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांना मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी सदर साहित्याबाबत व यंत्रांविषयी माहिती दिली. यावेळी अग्निशमन विभागाच्या ६४ मिटर उंचीच्या टर्न टेबल लॅडर वाहनाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अग्निशमन विभागाचे श्री.विशाल जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अग्निशमन विभागाचे श्री.विशाल शिर्के यांनी केले.

या कार्यक्रमावेळी मा.महापौर श्री.अजीव पाटील, मा.आयुक्त श्री.पृथ्वीराज बी.पी.(भा.प्र.से.), मा.प्रथम महापौर श्री.राजीव पाटील, मा.स्थायी समिती सभापती श्री.प्रवीण शेट्टी, मा.सभागृह नेते श्री.प्रफुल्ल साने, मा.विरोधी पक्ष नेते श्री.मनोज पाटील, मा.नगरसेविका - श्रीम.प्रज्ञा पाटील, श्रीम.स्मिता पाटील, श्रीम.पिंकी राठोड, श्रीम.कल्पना नागपुरे, मा.नगरसेवक - श्री.अशोक शेळके, श्री.गणेश पाटील, श्री.पंकज देशमुख, श्री.अभय कक्कर, मा.माजी परिवहन सभापती श्री.भरत गुप्ता व श्री.प्रीतेश पाटील, अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, उप-आयुक्त श्री.अजित मुठे, इतर मान्यवर तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.       

अग्निशमन विभागामार्फत महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील निश्चित केलेल्या ठिकाणी व दिनांक, वेळेनुसार अग्निशमन वाहने व साहित्यासह प्रात्यक्षिके सादर करण्यात येत आहेत. तरी सदरील प्रात्यक्षिके पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या ‘अग्निशमन सेवा सप्ताहात’ सहभागी व्हावे असे आवाहन वसई विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागातर्फे करण्यात येत आहे.

Home Admin Contact About
Home Admin Contact About