मा. श्री अजीव पाटील यांची महापौर पदी निवड वसईकर साहित्य प्रेमी साठी आनंदाची पर्वणी श्री अशोक मुळे डिंपल पब्लिकेशन - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Friday, 6 February 2026

मा. श्री अजीव पाटील यांची महापौर पदी निवड वसईकर साहित्य प्रेमी साठी आनंदाची पर्वणी श्री अशोक मुळे डिंपल पब्लिकेशन

 


माननीय अजीव यशवंत पाटील यांची महापौरपदी निवड – वसईकर साहित्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी :-श्री अशोक मुळे डिंपल पब्लिकेशन 


वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव, साहित्यस्नेही व्यक्तिमत्व, संपादक, लेखक आणि कवी माननीय श्री. अजीव यशवंत पाटील यांची निवड होणे, ही केवळ एक राजकीय घटना नाही; तर वसईच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक परंपरेस मिळालेली नवी दिशा आहे. हे आम्हा वसईकर साहित्यप्रेमींसाठी अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण आहेत.


शांत, गंभीर, मृदूभाषी आणि सर्वांना आपलेसे वाटणारे अजीव पाटील हे केवळ लोकप्रतिनिधी नसून, ते वसईच्या साहित्यिक आत्म्याचे संवाहक आहेत. गेली अनेक वर्षे ते ‘सागरलाटा’ या दर्जेदार दिवाळी अंकाचे संपादन करीत असून, स्वतः कवी व लेखक म्हणून त्यांनी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘साहित्य जल्लोष प्रतिष्ठान’चे विश्वस्त म्हणून त्यांनी वसईतील लेखक, कवी आणि कलावंतांना गेली तीन दशके एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.


गेल्या तीस वर्षांत साहित्य जल्लोष या चळवळीमुळे वसईत साहित्य आणि संस्कृतीचे एक समृद्ध, सृजनशील वातावरण निर्माण झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक व कलावंत वसईत येऊन गेले. यामुळे ऐतिहासिक वसईला एक स्वतंत्र साहित्यिक व सांस्कृतिक ओळख प्राप्त झाली.


अजीव पाटील यांचे साहित्यावरील निस्सीम प्रेम हे त्यांच्या जीवनप्रवासात ठळकपणे दिसून येते. मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, केशव मेश्राम, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, लालन सारंग यांसारखे अनेक नामवंत साहित्यिक व कलाकार त्यांच्या स्नेहवर्तुळाचा भाग राहिले. घरात, गच्चीवर रंगणाऱ्या मैफिली, कविता, गाणी आणि संवादातून साहित्याची जिवंत परंपरा फुलत गेली.


गेल्या पाच वर्षांतील प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींचा अभाव, ढासळलेली नागरी व्यवस्था, रस्त्यांची दुरवस्था, पाणी, सांडपाणी, आरोग्य, शिक्षण, अनधिकृत बांधकामांचा स्फोट, खेळाच्या मैदानांचा अभाव आणि खालावत चाललेला हवेचा दर्जा – या साऱ्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशा पार्श्वभूमीवर जनतेने खऱ्या अर्थाने आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत.


आजच्या राजकीय धुमश्चक्रीत, पैशांच्या अवकाळी पावसात आणि बोथट झालेल्या संवेदनांमध्ये, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व अत्यंत गरजेचे आहे. वसई–विरार महानगरपालिकेने नागरी सुविधा देताना, वसईची साहित्यिक व सांस्कृतिक भूकही भागवली पाहिजे, ही अपेक्षा आता अधिक बळकट झाली आहे.


साहित्य जल्लोष, वसई कला क्रीडा महोत्सव, वसई विजयोत्सव, विवा कवी कट्टा, मॅरेथॉन यांसारखे उपक्रम वसईत सातत्याने सुरू राहण्यात ‘यंग स्टार्स, विरार’ संस्थेचा मोलाचा वाटा असून, लोकनेते माननीय श्री. हितेंद्र ठाकूर यांनी या सांस्कृतिक चळवळींना नेहमीच दूरदृष्टीने पाठबळ दिले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील पहिलीच महानगरपालिका जी स्वतः साहित्य जल्लोषाच्या आयोजनात सहभागी झाली, ती म्हणजे वसई–विरार महानगरपालिका – याचा अभिमान नक्कीच वाटतो.


पहिल्या महिला महापौर माननीय सौ. प्रवीणा हितेंद्र ठाकूर या कवयित्री असून, त्यांनी बालकल्याण व महिला समितीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबविले. आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकत, अजीव पाटील यांच्या रूपाने वसईला एक संपादक, लेखक, कवी आणि संवेदनशील महापौर लाभला आहे.


भारतीय घटनेत साहित्यिक आणि कलावंतांना लोकशाही संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली असली, तरी प्रत्यक्षात असे व्यक्तिमत्व सत्तेपासून दूर राहिले. अशा परिस्थितीत, वसईकरांसाठी आपलेसे वाटणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि जनतेच्या भावभावनांचा आदर करणारे साहित्यिक महापौर लाभणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.


डिंपल प्रकाशन परिवारातर्फे

माननीय श्री. अजीव यशवंत पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन

आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Home Admin Contact About
Home Admin Contact About