तारपाच्या संस्कृतीतून जपली पालघर जिल्ह्याने परंपरा - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Sunday, 25 January 2026

तारपाच्या संस्कृतीतून जपली पालघर जिल्ह्याने परंपरा

 


*तारपाच्या संस्कृतीतून जपली पालघर जिल्ह्याने  परंपरा*   


 *ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांना पद्म पुरस्कारासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिल्या शुभेच्छा*


पालघर दिनांक 25 जानेवारी : “आपली परंपरा आणि संस्कृती जपणं हेच माझं आयुष्य. तारपाच्या नादातून मी देवांची आराधना केली. त्यामुळंच देवाचा आशिर्वाद लाभला,” अशा भावूक शब्दांत पालघर जिल्ह्यातील वाळवंडा येथील ज्येष्ठ आदिवासी तारपावादक भिकल्या धिंडा यांनी आपल्या जीवनप्रवासाची भावना व्यक्त केली. त्यांच्या या तपस्वी सांस्कृतिक सेवेला मान्यता देत केंद्र सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. या घोषणेमुळे धिंडा कुटुंबासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

भिकल्या धिंडा आज ९२ वर्षांचे असून, अवघ्या दहाव्या वर्षापासून ते तारपावादन करत आहेत. ही कला त्यांच्या कुटुंबात सुमारे ४०० वर्षांपासून चालत आलेल्या वंशपरंपरेचा भाग आहे. आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानले जाणारे तारपा वाद्य त्यांनी केवळ वाजवले नाही, तर ते आपल्या जीवनाशी एकरूप करून जपले. देवपूजा, उत्सव, सण-समारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांत तारपाच्या नादातून त्यांनी आदिवासी जीवनशैलीचे दर्शन घडवले.

उत्कृष्ट तारपावादक म्हणून भिकल्या धिंडा यांची सर्वदूर ओळख आहे. वडिलांकडून मिळालेली ही कला त्यांनी तारपाची निर्मिती आणि वादन या दोन्ही माध्यमांतून जोपासली. जवळपास दहा फूट लांबीचा तारपा वाजवणे हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. आजवर त्यांनी राज्यासह देशातील विविध ठिकाणी आपल्या तारपावादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. विशेष म्हणजे, अनेक युवकांना त्यांनी तारपावादनाचे धडे देत ही परंपरा पुढील पिढीकडे सुपूर्द केली आहे. तारपा वाद्याची स्वतः निर्मिती करून ते आपला चरितार्थ चालवतात.

भिकल्या धिंडा यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. “आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी भिकल्या धिंडा यांनी आयुष्य वेचले असून, त्यांचा हा सन्मान संपूर्ण पालघर जिल्ह्यासाठी गौरवाचा क्षण आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

आदिवासी लोककलेचा जिवंत वारसा जपत आयुष्यभर निस्वार्थ सेवा करणाऱ्या भिकल्या धिंडा यांच्यावर पद्म पुरस्काराची मोहर उमटल्याने पालघर जिल्ह्यातून तसेच आदिवासी समाजातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्यामुळे तारपा वाद्याला आणि आदिवासी संस्कृतीला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

Home Admin Contact About
Home Admin Contact About