वसई-विरार शहर महानगरपालिका
दि.०५/१२/२०२५
*मा.आयुक्त महोदयांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीची कारवाई*
वसई विरार शहर महानगरपालिका मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ‘डी’ आचोळे सहाय्यक आयुक्त श्री.जितेंद्र नाईक व त्यांचे पथकाने दि.०५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रभाग समिती ‘डी’ आचोळे हद्दीत एका गोडावून मध्ये प्रतिबंधित प्लास्टिक साठा ठेवल्याबद्दल कारवाई करून *०९ टन पेक्षा जास्त* प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त केला. महानगरपालिकेच्या इतिहासातील ही आजपर्यतची सर्वात मोठी प्रतिबंधित प्लास्टिक जप्तीची कारवाई आहे.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘डी’ आचोळे हद्दीतील साडी कंपाऊंड, नालासोपारा पूर्व येथील एका गोडावूनमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा असलेची माहिती महानगरपालिकेला मिळताच सहाय्यक आयुक्त श्री.जितेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती ‘डी’ आचोळे विभागाचे पथक तात्काळ सदर ठिकाणी दाखल होऊन प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्तीची कारवाई सुरु केली. याबाबत माहिती मिळाल्यावर मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे हे स्वतः कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहिले व कारवाईच्या करणेबाबतच्या अनुषंगीक सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या. प्रतिबंधित प्लास्टिकचा जप्त केलेला साठा अंदाजे ०९ टन पेक्षा जास्त असून संबंधितांवर महानगरपालिकेमार्फत दंडात्मक कारवाई करून ५०००/-रु. दंड वसूल करण्यात आला.
प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री, वापर करताना आढळल्यास नियमानुसार प्रथम वेळी रु.५०००/- दंड, द्वितीय वेळी रु.१००००/-दंड आणि तृतीय वेळच्या गुन्हास रु.२५०००/- दंड व ०३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा असे कारवाई व दंडाचे स्वरूप आहे. यामुळे कोणत्याही व्यापाऱ्याने प्रतिबंधित प्लास्टिक खरेदी किंवा विक्री करून तसेच नागरिकांनीही प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करून आपले शहर विद्रूप करू नये व पर्यावरणास हानी पोहोचेल अशी कोणतीही गोष्ट करू नये असे आवाहन मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
प्रतिबंधित प्लास्टिक वापरास बंदी असून त्याची कठोर अंमलबजावणी शहरात सुरु आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण विक्री, वापर करताना आढळल्यास महानगरपालिकेमार्फत संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून ही कारवाई यापुढेही सुरूच राहील, असे मा.आयुक्त महोदयांनी यावेळी सांगितले.


