*कोकण विभागाचा भगवान बिरसा कलासंगम कार्यक्रम उत्साहात संपन्न*
पालघर दिनांक २९ ऑक्टोबर : प्रगती प्रतिष्ठान, जव्हार येथे महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग आणि भगवान बिरसा कला मंच यांच्या माध्यमातून आदिवासी कलाकारांसाठी कलासंगम कार्यक्रम पार पडला.
आदिवासी समाज हा आपली महान संस्कृती, परंपरा, विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून हजारो वर्षे जोपासत आला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व 47 जनजातींचे आपले असे नृत्य, गायन, वाद्य वादन, चित्रकला आणि हस्तकला आहे हे कलाप्रकार सण, लग्नकार्य, गावदेव, देवीच जागरण या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला विविध गावांमध्ये बघायला मिळतात. याबरोबरच अनेक आदिवासी तरुण ह्या पारंपारिक कला परंपरांना रिल्स, डॉक्युमेंट्री आणि फोटोग्राफी यांच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे आपल्याला दाखवत आलेले आहेत. ह्या सुंदर आणि श्रेष्ठ कला परंपरांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावं, या कलापरंपरांचं चांगलं डॉक्युमेंटेशन व्हावं, संपूर्ण जगासमोर हे प्रदर्शित व्हावं या उद्देशाने भगवान बिरसा कला मंच अविरत काम करत आहे. महाराष्ट्र शासन – आदिवासी विकास विभाग यांच्या सहाय्याने भगवान बिरसा कला मंच 5 पारंपारिक कलापरंपरा जसे की नृत्य, गायन, वाद्य वादन, चित्रकला आणि हस्तकला या स्पर्धा महाराष्ट्रातल्या सर्व जनजातींसाठी घेत आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षा निमित्ताने आपण घेत असलेल्या या स्पर्धेला भगवान बिरसा कलासंगम असे नाव देण्यात आले आहे. जुलै 2025 मध्ये स्पर्धेची सुरुवात झाली आणि या स्पर्धेत आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या १०,००० पेक्षा जास्त कलाकारांनी विविध श्रेणीमध्ये आपली नोंदणी केली. याचबरोबर या आदिवासी कलाकारांनी आपल्या कलेचा कंटेंट अपलोड केला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या पाच विभागात होत आहे ज्यामध्ये कोकण विभागाची स्पर्धा संपन्न झाली. एकूण ४०० हुन अधिक कलाकारांनी यात नृत्य, गायन, वाद्य वादन, हस्तकला आणि चित्रकला या स्पर्धेच्या माध्यमातून आपली कला प्रस्तुत केली. सकाळी हिरवा देव, धरतरी माता, भगवान बिरसा मुंडा यांच्या पूजनाने स्पर्धा सुरु झाली. या टप्प्यात कोकण विभागात निवड झालेले कलाकार स्पर्धक पुढे 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जयंती जनजाती गौरव दिनाच्या मुख्य कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती कला परंपरा यांचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला होत आहे. भविष्यातही आपल्या श्रेष्ठ आदिवासी कलेची सेवा करण्याचा भगवान बिरसा कला मंचाचा मानस आहे. या कार्यक्रमाला प्रगती प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम आगवण, आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे, जनजाती विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष नरेश मराड, ज्येष्ठ कलाकार हरेश्वर वनगा तसेच मुंबई विद्यापीठाचे कला विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

