**डहाणूत मुलभूत अधिकारांसाठी २७ ऑक्टोबरला सत्याग्रह आंदोलन**
डहाणू तालुक्यातील नागरिकांच्या विविध मागण्या आणि मुलभूत अधिकारांसाठी येत्या सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ रोजी डहाणू पारनाका येथून सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या मोर्चाद्वारे पंचायत समितीसमोर शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या आंदोलनाचे आयोजन भारताचा माक्सवादी-लेनिनवादी लाल बावटा पक्षाच्या डहाणू तालुका कमिटीच्या वतीने करण्यात आले असून, तालुका सहसचिव काॅ. किरण दुबळा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हा सहसचिव काॅ. शेरू वाघ यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मोर्चाची सुरुवात सकाळी पारनाका येथून होऊन तो पंचायत समिती कार्यालयापर्यंत जाईल. तिथे पक्षाच्या नेत्यांकडून तालुक्यातील आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या मूलभूत मुद्द्यांवर मागण्यांचे निवेदन सादर केले जाईल. या आंदोलनाद्वारे डहाणू परिसरातील स्थानिक समस्या आणि शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईल.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी एकजुटीने हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन तालुका कमिटीने केले आहे.
