माजी महापौर रुपेश जाधवांच्या 2021 च्या लेटर बॉम्बने सत्ताधाऱ्यांची कोंडी - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Thursday, 30 October 2025

माजी महापौर रुपेश जाधवांच्या 2021 च्या लेटर बॉम्बने सत्ताधाऱ्यांची कोंडी

 


माजी महापौर रुपेश जाधवांच्या २०२१ च्या *'लेटर बॉम्ब'ने* सत्ताधाऱ्यांची कोंडी!


वसई-विरारच्या राजकारणात आचोळे येथील प्रस्तावित रुग्णालयाचा विषय ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या सीमारेषेवरून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) यांच्यात झालेल्या संघर्षाची ठिणगी आता राजकीय वणव्यात रूपांतरित झाली आहे. एकीकडे भाजप या रुग्णालयाचे संपूर्ण श्रेय लाटण्यासाठी धडपडत असतानाच, 'बविआ'चे माजी महापौर रुपेश जाधव यांनी थेट २०२१ सालचे एक पत्रच प्रसिद्धीस देऊन सत्ताधाऱ्यांच्या दाव्यातील हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आचोळे रुग्णालयाचा मुद्दा स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. भाजपकडून हा प्रकल्प आम्हीच मार्गी लावत असल्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र, या श्रेयाच्या लढाईत आता बविआने माजी महापौर रुपेश जाधव यांच्या जुन्या पाठपुराव्याचा भक्कम पुरावा पुढे आणला आहे.


*काय आहे रुपेश जाधवांच्या पत्रात?*

माजी महापौर रुपेश जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्र २९ सप्टेंबर २०२१ रोजीचे आहे. हे पत्र त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांना उद्देशून लिहिले होते. या पत्रातील तपशील भाजपच्या श्रेयाच्या राजकारणाला थेट छेद देणारा आहे. या पत्रात रुपेश जाधव यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, "आचोळे, मोरेपाडा, वाकणपाडा, तसेच वसई पूर्व व पश्चिम येथील लाखोंची लोकसंख्या लक्षात घेता, सर्व्हे क्र. ०6 वरील प्रस्तावित हॉस्पिटल हे अतिशय लहान आहे." त्यांनी पुढे म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी "जास्तीत जास्त रुग्ण क्षमतेचे अद्ययावत व सुसज्ज सर्व सोयींनी युक्त असे मोठे हॉस्पिटल" होणे अपेक्षित आहे.

रुग्णांच्या हालअपेष्टांवर ठेवले होते बोट

जाधवांनी २०२१ मध्येच शहरातील अपुऱ्या आरोग्य सुविधांवर बोट ठेवत आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते की, शहरात सुविधा नसल्याने रुग्णांना तीन-तीन तासांचा प्रवास करून मुंबई गाठावी लागते. दुर्दैवाने, "बरेचदा तिथे पोहोचण्याआधीच रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत," अशी खंतही त्यांनी पत्रात व्यक्त केली होती. त्यांनी या पत्राद्वारे, प्रस्तावित जागेवर लहान रुग्णालयाऐवजी, "मोठ्या स्वरूपात व सर्व सोयींनी सुसज्ज असे अद्ययावत हॉस्पिटल" लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली होती.


*'लेटर बॉम्ब'ने भाजपची कोंडी*

रुपेश जाधव यांनी हे पत्र नेमके आताच उजेडात आणल्याने भाजपची राजकीय कोंडी झाली आहे. ज्या रुग्णालयाचे श्रेय भाजप आज घेत आहे, त्या रुग्णालयाचा मूळ प्रस्तावच अपुरा आणि लोकसंख्येच्या मानाने अत्यंत तोकडा होता, हे बविआने सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे, तर बविआने केवळ जागेच्या मोजमापावर नव्हे, तर तेथे एक भव्य आणि सर्वसोयीयुक्त रुग्णालय व्हावे यासाठी २०२१ पासूनच पाठपुरावा सुरू केला होता, हे या पत्राने अधोरेखित केले आहे. त्यामुळे, भाजप केवळ 'सीमारेषा' आखून श्रेय घेत असताना, आम्ही 'भव्य रुग्णालयाचा' मूळ आराखडा मांडला होता, असा दावा आता बविआकडून केला जात आहे. एकंदरीत, आचोळे रुग्णालयाचा हा वाद आता केवळ सीमारेषापुरता मर्यादित राहिला नसून, तो 'श्रेय विरुद्ध दूरदृष्टी' असा बनला आहे. रुपेश जाधव यांच्या या 'लेटर बॉम्ब'ने सत्ताधारी भाजपच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले असून, या प्रकरणावरून येत्या काळात वसई-विरारचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

Home Admin Contact About
Home Admin Contact About