*पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त भव्य बीच क्लिनिंग उपक्रम*
पालघर दिनांक १८: ‘सेवा पर्व 2025’ आणि आंतरराष्ट्रीय किनार स्वच्छता दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात भव्य बीच क्लिनिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यांवरील प्लास्टिक व अन्य कचरा निर्मूलन करून किनारपट्टी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, शाळा-विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक नागरिक, एनसीसी-एनएसएस स्वयंसेवक, महिला बचत गट, व्यापारी, उद्योजक तसेच विविध विभागीय कार्यालये यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
केळवे समुद्रकिनारा येथे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाला खासदार डॉ.हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित राहून मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी ७ वाजता सुरू होणाऱ्या या मोहिमेत स्वयंसेवकांना प्लास्टिकविरहित साहित्य (ज्यूट पिशव्या, हातमोजे, स्टील झाडू, कचरा गोळा करण्याची साधने) उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
बीच क्लिनिंग मोहिमेद्वारे जमा झालेला कचरा विभागून त्याचे सुरक्षित विल्हेवाट लावण्यात येईल. तसेच उपक्रमाचे फोटो-व्हिडिओ प्रात्यक्षिकांसह केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत.
या मोहिमेमुळे किनाऱ्यांचे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संवर्धन, मत्स्य व्यवसायाला चालना, समुद्रकिनारी पर्यटनाला गती तसेच स्थानिक समाजामध्ये समुद्रकिनाऱ्याबाबत जागरूकता वाढेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
“सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, स्थानिक बचत गट व सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे. चला, स्वच्छ किनारा – सुंदर किनारा या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवूया!” असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फ करण्यात आले आहे.
दिनांक : 20 सप्टेंबर 2025
वेळ : सकाळी ७ वाजता
स्थळ : केळवे समुद्र किनारा, पालघर