*आदि कर्मयोगी अभियानाची तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न*
*गाव विकास आराखड्याकडे भक्कम पाऊल*.
पालघर दिनांक 18 : आदि कर्मयोगी अभियानांतर्गत गाव पातळीवरील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका पातळीवरील सर्व विभाग प्रमुखांची कार्यशाळा प्रकल्प कार्यालय, जव्हार येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यशाळेची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रस्ताविकात सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके (DMT जिल्हा मास्टर ट्रेनर) यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला.
तालुका मास्टर ट्रेनर (BMT) संदेश दुमाडा, जयराम अढळ, जागृती किरकिरे यांनी संयुक्तपणे मार्गदर्शन केले. गाव बैठका, विभागांमधील समन्वय, आदिवासी नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, युवक मंडळे, महिला बचत गट यांच्या सहभागातून गाव विकास आराखडा कसा तयार करावा यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी उंबरवागणं या गावाचा यशस्वी मॉडेल अनुभवही मांडण्यात आला.
वयम चळवळीचे प्रकाश बरफ यांनी लोकसहभागाचे महत्त्व पटवून दिले, तर विनायक थाळकर यांनी पेसा कायद्यांतर्गत गावांना मिळालेल्या अधिकारांचा उपयोग करून गाव विकास अधिक प्रभावी करण्यावर भर दिला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अपूर्वा बासुर यांनी गाव विकास आराखड्यात स्थानिक पर्यटन स्थळांचा समावेश करून रोजगारनिर्मिती व बाजारपेठ उपलब्ध होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “अधिकाधिक गावे आदि कर्मयोगी अभियानात सक्रिय सहभाग घेतल्यास जव्हार तालुक्याची नोंद संपूर्ण भारतात आदर्श म्हणून होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेत सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी अभियान यशस्वी करण्याची प्रतिज्ञा घेतली. शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण विभाग यांच्यासह अनेक विभाग प्रमुख आणि स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन पेसा व्यवस्थापक मनोज कामडी यांनी केले.
पुढील टप्प्यात VAP गाव विकास आराखडा तयार करण्याची पूर्वतयारी केली जाणार आहे.