वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ए बोळींज अंतर्गत डोंगरपाडा, विरार पश्चिम येथील गणेश को.ऑप.हौ.सोसायटी या इमारती मधील एका सदनिकेच्या छताचा स्लॅब कोसळून ३ व्यक्ती जखमी झाल्या. जखमी व्यक्तींना त्वरित वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत.
सदर इमारत ही ३० वर्षापेक्षा जास्त जुनी असून एप्रिल महिन्यात सदर इमारतीला महानगरपालिकेतर्फे स्ट्रक्चरल ऑडिट करणेसाठी नोटीस बजावण्यात आली होती. स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार सदर इमारत ही सी२ए (C2A) या श्रेणीत मोडत असल्याने इमारत दुरुस्ती करणे आवश्यक होते. परंतु इमारती मधील रहिवाशी, विकासक यांच्यामधील अंतर्गत वादामुळे इमारत दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही.
घटनेची माहिती मिळताच महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, सहाय्यक आयुक्त श्री.मनोज वनमाळी, सहाय्यक आयुक्त श्री.निलेश म्हात्रे, अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. प्रशासनामार्फत सदर इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली असून सदर इमारतीचे पुनश्च स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत व त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.