मोनोरेल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित- मोनो ची तांत्रिक प्रणाली अपग्रेडेशन आणि भविष्यातील कार्यक्षमतेसाठी एमएमआरडीए चे पाऊल*
मुंबई मोनोरेल यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने २० सप्टेंबर, २०२५ पासून मोनोरेल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नियोजित ब्लॉकमुळे नवीन 'रोलिंग स्टॉक' (रेल्वे रेक्स), प्रगत CBTC सिग्नलिंग प्रणाली, आणि विद्यमानमोनो रेल च्या दुरुस्ती करण्याचं मोठं काम करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मोनोरेल पुन्हा अधिक ताकदीने आणि विश्वासार्हतेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये सज्ज होईल.
*महत्त्वाच्या सुधारणा*
हैदराबादमध्ये विकसित झालेली अत्याधुनिक CBTC (Communication-Based Train Control) प्रणाली प्रथमच मुंबई मोनोरेलसाठी बसवली जात आहे:
• ५ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग -३२ ठिकाणी बसवण्यात आले असून चाचणी सुरू आहे.
• २६० Wi-Fi ॲक्सेस पॉइंट्स, ५०० RFID टॅग्स, ९० ट्रेन डिटेक्शन युनिट्स आणि अनेक WATC युनिट्स आधीच बसवले गेले आहेत.
• वे साइड सिग्नलिंगचे काम पूर्ण झाले असून एकात्मिक चाचणी सुरू आहे.
हे सगळं झाल्यावर गाड्या अधिक सुरक्षित, वेळेवर आणि सुरळीत धावतील.
*रोलिंग स्टॉक आधुनिकीकरण*
एमएमआरडीएने मे. मेधा आणि एसएमएच रेल यांच्या सहकार्याने १० नवीन मेक-इन-इंडिया रेक्स खरेदी केले आहेत.
• ८ रेक्स पोचले आहेत.
• ९ वा रेक तपासणीसाठी सज्ज.
• १० वा रेक तयार करण्याचे काम सुरू आहे
*सेवा का थांबविली जाते आहे?*
दररोज सकाळी ६:१५ ते रात्री ११:३० पर्यंत सेवा चालू असल्याने, केवळ ३.५ तासच रात्री उरतात. जे एवढा मोठ्या कामासाठी खूपच कमी आहेत. सेफ्टी प्रोटोकॉलनुसार पॉवर रेल बंद करणे, डिस्चार्ज करणे व पुन्हा रिचार्ज करणे ही कामे या कालावधीत करणे अवघड होते.
*सेवा स्थगितीचा उद्देश*
• नवीन रेक्स आणि सिग्नलिंग सिस्टीमच्या स्थापनेसाठी अखंडित वेळ मिळवण्यासाठी.
• जुन्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करून त्यांना नव्या सारखं करणं.
• मनुष्यबळाला प्रशिक्षण देऊन मेट्रोच्या पुढील प्रकल्पात त्यांचा उपयोग करणं.
मागील काही दिवसांत तांत्रिक अडचणी आल्यामुळे एमएमआरडीएने चौकशी समितीही नेमली आहे. दीर्घकाळासाठी सेवा विश्वासार्ह रहावी म्हणून हा तात्पुरता विराम घेण्यात येत आहे.
चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनोरेलची दोन्ही मार्गावरील सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णतः बंद राहील. नागरिकांनी पुढील प्रवाशाची योग्य आखणी करून सहकार्य करावे.
*मुंबईकरांसाठी आश्वासन*
एमएमआरडीए नागरिकांना विश्वास देते की, हा विराम म्हणजे थांबणं नाही, तर सेवेला नव्या जोमाने उभं करण्याचं पाऊल आहे. मोनोरेल परत सुरू झाली की ती आधीपेक्षा अधिक सुरक्षित, वेगवान आणि विश्वासार्ह असेल.
श्री. एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री व अध्यक्ष, एमएमआरडीए म्हणाले:
*"मोनोरेलसाठी घेतलेला हा ब्लॉक म्हणजे मुंबईच्या वाहतूक कणखरतेसाठी टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. नवीन गाड्या , अत्याधुनिक CBTC सिग्नलिंग आणि विद्यमान गाड्याचे आधुनिकीकरण यामुळे नागरिकांसाठी अधिक सुरक्षित व विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. थोडासा वेळ मुंबईकरांनी सहकार्य दिल्यास आम्ही मोनोरेलला नव्या स्वरूपात परत आणू."*
डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले:
*"हा तात्पुरता ब्लॉक म्हणजे मोनोरेलला नवजीवन देण्याचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. नवीन रेक्सचा समावेश, CBTC प्रणालीची अंमलबजावणी आणि जुने रेक्सचे नूतनीकरण यामुळे ही सेवा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यकालीन बनेल. मुंबईकरांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत. लवकरच मोनोरेल नव्या ताकदीने आणि विश्वासाने परत येईल."*