*शासनाच्या सेवा थेट नागरिकापर्यंत पोहचणार*
*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*
पालघर, दि. 17 : शासनाच्या विविध सेवा व उपक्रम थेट नागरिकापर्यंत निमित्त पोहचणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा” (17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025) या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आमदार राजेंद्र गावित, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी विजया जाधव,उपजिल्हाधिकारी सर्वश्री.रणजित देसाई, रविंद्र राजपूत, महेश सागर, तेजस चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी शासनाच्या विविध योजना, सेवा आणि सुविधा या मिशन मोडवर प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले की हा सेवा पंधरवडा केवळ औपचारिक उपक्रम नसून नागरिक सबलीकरणाचा संकल्प आहे. शासनाच्या सर्व योजना लाभार्थ्यांना वेळेत, काटेकोरपणे आणि पारदर्शक पद्धतीने मिळाल्या पाहिजेत, यासाठी महसूल विभाग आणि सर्व अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध आहेत.”
डॉ. इंदु राणी जाखड यांनी या पंधरवड्यात राबवल्या जाणाऱ्या चार अभिनव उपक्रमांची माहिती दिली. ‘संकल्प, सार्थक, सुलभ आणि समर्थ’ या संकल्पनांवर आधारित उपक्रमातून शासनाने लाभार्थ्यांचे सबलीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये शासनाच्या योजनांचा लाभ अद्याप ज्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही, त्यांना प्राधान्याने योजना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी गावस्तरीय रस्त्यांचे नोंदवही अद्ययावत करणे, अतिक्रमण तपासणी, ग्रामसभेत मंजुरी घेणे या बाबींवर भर देत सांगितले की यामुळे ग्रामपंचायतींच्या रस्त्यांशी संबंधित अडचणी दूर होऊन विकासकामांना गती मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना आणि अन्य घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वेळेवर घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी महसूल विभागाला स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने या सेवा पंधरवड्याची सांगता होणार असून, नागरिकाभिमुख प्रशासनाची दिशा निश्चित करणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.
---