दुर्घटनाग्रस्त रमाबाई अपार्टमेंट रहिवाशांना म्हाडाच्या सदनिकांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Monday, 1 September 2025

दुर्घटनाग्रस्त रमाबाई अपार्टमेंट रहिवाशांना म्हाडाच्या सदनिकांमध्ये तात्पुरती निवास व्यवस्था

दुर्घटनाग्रस्त रमाबाई अपार्टमेंट मधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या म्हाडाच्या इमारतींमधील सदनिका
=========================

वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती सी मधील नारंगी रोड, विरार (पूर्व) येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागील भाग मंगळवार दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ११.४५ वा. दरम्यान अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ रहिवाशांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तसेच ०९ रहिवासी जखमी झाले. 
    या दुर्घटनेची दखल घेत मा.मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडवणीस,मा.उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांनी दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मा.मुख्यमंत्री महोदयांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना तात्काळ ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
    तसेच जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा.ना.श्री.गिरीशजी महाजन, वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गणेशजी नाईक, परिवहन मंत्री मा.ना.श्री.प्रतापजी सरनाईक यांनीही घटनास्थळी भेट दिली.तसेच दुर्घटनेतील जखमी व्यक्तींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या दुर्घटनेबाबत महानगरपालिका मुख्यालयातील बैठक घेवून दुर्घटनाग्रस्तांना मदत मिळणेकामी व अशा प्रकारच्या दुर्घटना होवू नये यासाठी प्रशासनाला विविध सूचना दिल्या. 
    मा.जलसंपदा मंत्री यांनी दुर्घटनाग्रस्तांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. 
    मा.पालकमंत्री महोदयांनी दुर्घटना ग्रस्त रहिवाशांना महानगरपलिकेमार्फत आर्थिक मदत तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या सूचना दिल्या तसेच अशाप्रकारच्या दुर्घटना पुन्हा होवू नये यासाठी महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना म्हाडाच्या इमारतींमध्ये राहण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत कॅबिनेट बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले.
    मा.परिवहन मंत्री यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची सोय करण्यासाठी म्हाडा उपाध्यक्षांशी संपर्क साधुन म्हाडाच्या ६० सदनिका महानगरपालिकेला तात्पुरत्या स्वरूपात देणे बाबत विनंती केली.मा.मंत्री महोदयांनी मागणी केल्याप्रमाणे विरार येथील म्हाडा संकुलामधील ६० सदनिका दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना देण्यासाठी म्हाडाकडून तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आल्या. दि.३१ ऑगस्ट रोजी मा.आमदार श्री.राजेंद्रजी गावीत (पालघर विधानसभा मतदार संघ) यांच्या हस्ते ४२ सदनिकांच्या चाव्या रहिवाशांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी मनपा सहा.आयुक्त श्री.गिल्सन गोंसालविस, महानगरपालिका कर्मचारी,संबंधित रहिवासी उपस्थित होते.
      दुर्घटनाग्रस्त इमारतींमधील विस्थापित रहिवाशांना विरार येथील म्हाडा संकुलामध्ये घरांची उपलब्धता करून देण्यासाठी पालघर जिल्ह्याचे मा.खासदार डॉ. श्री. हेमंतजी सवरा, मा.आमदार श्री.राजनजी नाईक (नालासोपारा विधानसभा मतदार संघ), मा.आमदार श्रीम.स्नेहाताई दुबे - पंडित (वसई विधानसभा मतदार संघ) यांनीही विशेष प्रयत्न केले.त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
      मा.लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल दुर्घटनाग्रस्त रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.
Home Admin Contact About
Home Admin Contact About