१७ बळींच्या दुर्घटनेनंतर आमदार स्नेहा दुबे पंडित आक्रमक :“नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा, अनधिकृत बांधकामांच्या साम्राज्याला नेस्तनाबूत करा”
विरार पूर्वेतील विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट कोसळून १७ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण वसई-विरार हादरले आहे. या घटनेनंतर वसईच्या आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. “नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा” – आमदार पंडित यांचा खडा सवालया दुर्घटनेत सहा महिला, आठ पुरुष आणि तीन निरागस बालकांचा बळी गेला. हृदय पिळवटून टाकणारी बाब म्हणजे एका वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर अवघ्या दोन तासात तिचाही मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले आहे.आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, “ही काही पहिली घटना नाही. मी वेळोवेळी शहरातील अनधिकृत बांधकामांचा धोका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता, पण प्रशासनाने कानाडोळा केला. भूमाफिया आणि त्यांना संरक्षण देणारे अधिकारी – या दोन्हींच्या संगनमतामुळेच आज १७ बेकसूर जीव गमावले गेले आहेत.”
प्रशासनाला निवेदन, ठोस मागण्या
महानगरपालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांना आमदार पंडित यांनी निवेदन देऊन विशेष उपाययोजनांची मागणी केली आहे.
1️⃣ विशेष पथके तयार करावीत – महानगरपालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये ४-५ कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष पथके तातडीने नेमावीत.
2️⃣ पथकांची अदलाबदल – ही पथके त्यांच्या स्वतःच्या प्रभागात न नेमता इतर प्रभागांमध्ये नेमावीत, जेणेकरून स्थानिक दबाव व हितसंबंध आड येणार नाहीत.
3️⃣ एक आठवड्यात सर्वेक्षण – मागील ७-८ महिन्यांत झालेल्या व सुरू असलेल्या सर्व अनधिकृत इमारती, चाळी, व्यावसायिक आस्थापना व गोडाऊन यांचे सर्वेक्षण एका आठवड्यात पूर्ण करावे.
4️⃣ तात्काळ कारवाई – सर्वेक्षणात आढळलेल्या रिकाम्या अनधिकृत बांधकामांवर लगेचच निष्कासनाची कारवाई करावी. संबंधित भूमाफियांवर एम.आर.टी.पी. कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत.
“भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही कारवाई आवश्यक”
आमदार पंडित यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या भूमाफियाबरोबरच, त्यावेळच्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची मागणी केली आहे. “जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे दुष्टचक्र थांबणार नाही,” असे त्या म्हणाल्या.
शहरात संतापाची लाट
२०११ मध्ये बांधलेल्या या इमारतीचे धनी केवळ विकासकच नाहीत तर त्या काळातील संबंधित अधिकारीही असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर जनतेचा आक्रोश प्रचंड होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
आमदार पंडितांचा सज्जड इशारा
शेवटी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी प्रशासनाला इशारा दिला –
“शहरातील नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ आता अजिबात सहन केला जाणार नाही. कागदी घोडे नाचवण्याऐवजी प्रत्यक्ष कठोर कारवाई करून दाखवा. भविष्यात अशी एकही दुर्घटना घडणार नाही याची हमी प्रशासनाने द्यावी.”
१७ निरपराधांचा बळी गेलेल्या या दुर्घटनेने वसई-विरारचे हृदय विदीर्ण झाले आहे. नागरिकांच्या डोळ्यात अजूनही अश्रू आहेत, आक्रोश आहे. आणि या पार्श्वभूमीवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.
