*ठाण्यातील पहिली मेट्रो– मेट्रो मार्ग 4/4अ वर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला यशस्वी सुरुवात*
*या ऐतिहासिक क्षणाला मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री यांंच्या शुभहस्ते सुरुवात*
*मुंबई, २२ सप्टेंबर २०२५ –*
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ठाण्यातील पहिल्या मेट्रो मार्ग 4 व 4अ च्या प्राधान्य विभागावर आज तांत्रिक तपासणी आणि चाचणी धाव यशस्वीरित्या पार पडली.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व माननीय उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण पार पडला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार श्री. नरेश म्हस्के, विधान परिषद आमदार श्री. निरंजन डावखरे आणि प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) उपस्थित होते.
*या चाचणी धावेत टप्पा-1 मधील चार प्राधान्य स्थानकांचा समावेश करण्यात आला –*
गायमुख, गोवणीवाडा, कासारवडवली व विजय गार्डन असा ४.४ किमी टप्प्याचा समावेश आहे.
*तांत्रिक तपासणीचे स्वरूप:*
या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहेत की नाही याची खात्री करण्यात आली. उड्डाणपूल (Viaduct), मार्गिका (Track) आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) पूर्ण झाले असून, लोड कॅल्क्युलेशन व सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनसाठी माहिती संकलित करण्यात आली. तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणालींचे एकत्रीकरण तपासले गेले.
एमएमआरडीए प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून, स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनकर्ता (ISA) प्रमाणपत्र आणि त्यानंतर CMRS मंजुरी घेण्यात येईल. सर्व वैधानिक मंजुरी पूर्ण झाल्यानंतरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल.
*मेट्रो ट्रेनची वैशिष्ट्ये:*
*या मार्गावर धावणाऱ्या ८ डब्यांच्या मेट्रोमध्ये पुढील सुविधा उपलब्ध असतील –*
• आधुनिक ट्रेन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टम
• प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा
• स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली
• अडथळा शोध उपकरण
• आपत्कालीन दरवाजे व सुरक्षित बाहेर पडण्याची सोय
• सार्वजनिक उद्घोषणा व माहिती प्रणाली
• 30% वीज बचत करणारी पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणाली
*एकुण प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:*
• एकूण लांबी: 35.20 कि.मी. (मार्ग 4 – 32.32 कि.मी., मार्ग 4अ – 2.88 कि.मी.)
• एकूण स्थानके: 32
• प्रकल्प खर्च: ₹15,498 कोटी (मार्ग 4 – ₹14,549 कोटी, मार्ग 4अ – ₹949 कोटी)
• दैनंदिन प्रवासी संख्या (2031): 13.43 लाख
• मोघरपाडा डेपो: 45.5 हेक्टर (मार्ग 4, 4अ, 10 व 11 साठी एकत्रित सुविधा)
• ट्रेन रचना: 8 डब्यांची मेट्रो
*प्रकल्पाचे फायदे:*
• पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे, मुंबई व ठाणे यांना जोडणारा जलद मार्ग
• विस्तार – दक्षिणेला मार्ग 11 (वडाळा – सीएसटीएम), उत्तरेला मार्ग 4अ (कासारवडवली – गायमुख) व मार्ग 10 (गायमुख – मीरा रोड)
• पूर्णत्वानंतर 58 कि.मी. उन्नत मार्ग – देशातील सर्वात मोठा, 21.62 लाख दैनंदिन प्रवासी लाभार्थी
• प्रवास वेळेत 50–75% बचत
• पर्यावरणपूरक, सुरक्षित व आधुनिक वाहतूक प्रणाली
• रस्त्यावरील कोंडी कमी होणार, आर्थिक विकासाला चालना मिळणार
*आंतरबदल स्थानके:*
• गायमुख – मेट्रो मार्ग 10
• डोंगरीपाडा – ठाणे रिंग मेट्रो
• कापुरबावडी – मेट्रो मार्ग 5
• गांधी नगर – मेट्रो मार्ग 6
• सिद्धार्थ कॉलनी – मेट्रो मार्ग 2ब
• भक्ती पार्क – मेट्रो मार्ग 11 व मोनोरेल
*विशेष स्पॅन रचना:*
• अमर महल जंक्शन – 107 मी. स्टील ट्रस (2100 मेट्रिक टन)
• गांधी नगर – 65 मी. ‘W’ प्रकार स्टील गर्डर
• सोनापूर – 55 मी. ‘U-फ्रेम’ स्टील स्ट्रक्चर
• घाटकोपर – 50 मी. स्टील कंपोझिट डेक
• बुलेट ट्रेन क्रॉसिंग – 64 मी. स्टील डेक
*पूर्णत्व कालावधी:*
• टप्पा-1 (गायमुख – कॅडबरी जंक्शन): 10.5 कि.मी. (10 स्थानके) एप्रिल, 2026, त्यातील 4 स्थानके डिसेंबर, 2025
• टप्पा-2 (कॅडबरी – गांधी नगर): 11 कि.मी. (11 स्थानके) ऑक्टोबर, 2026
• टप्पा-3 (गांधी नगर – वडाळा): 12 कि.मी. (11 स्थानके) ऑक्टोबर, 2027
या ऐतिहासिक प्रसंगी
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की –
*"आज ठाणेकरांसाठी अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. ठाणेकरांना पहिल्यांदाच मेट्रो मिळते आहे आणि ही संपूर्ण ठाणेकरांसाठी ऐतिहासिक व अभिमानाची बाब आहे. भारतातील सर्वांत मोठ्या 58 किलोमीटरच्या उन्नत मेट्रो कॉरिडॉरची ही सुरुवात आहे, जी पुढे वडाळा ते सीएसटीएम आणि उत्तरेला मीरा रोडपर्यंत जोडली जाणार आहे. त्यामुळे मुंबईच्या उपनगरांना नवी जोडणी, नवे आर्थिक संधी आणि रोजगार निर्माण होणार आहेत. या प्रकल्पाला गती देण्यासाठी एमएमआरडीएने जे प्रयत्न केले आहेत, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मेट्रो मार्ग 4 आणि 4अ हा प्रकल्प केवळ एक वाहतूक साधन नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी विकासाची गती वाढवणारा आहे. या मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर असून त्यात 32 स्थानके प्रस्तावित आहेत. संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर दैनंदिन 13 लाख 43 हजारांहून अधिक प्रवासी मेट्रोचा लाभ घेतील. प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्क्यांनी कमी होईल, रस्त्यावरील कोंडीला मोठा दिलासा मिळेल आणि नागरिकांना पर्यावरणपूरक, सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सोय मिळेल."*
उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. एकनाथ शिंदेनी आनंदोद्गार काढले की–
*"आजचा दिवस ठाण्याच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. 1853 साली ठाण्यातून पहिली रेल्वे धावली होती आणि आज जवळपास 172 वर्षांनी ठाण्यात पहिली मेट्रो धावते आहे, ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. मेट्रो मार्ग 4 आणि 4अ हा ठाणे, मुलुंड, कासारवडवली, गायमुख ते वडाळा असा संपूर्ण पट्टा व्यापणारा प्रकल्प असून, या मार्गामुळे ठाणे शहराला अखंडपणे मुंबई आणि उपनगरांशी जोडणी मिळणार आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य असे की तो केवळ ठाणे आणि मुंबईपुरता मर्यादित नाही, तर भविष्यातील विस्तारामुळे तो मीरा-भाईंदर, कल्याण, भिवंडी अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, लॉजिस्टिक्स आणि उद्योगांना नवी चालना मिळेल आणि ठाणेकरांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडेल. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने सतत पाठबळ दिले, मा. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली कामाला वेग मिळाला आणि एमएमआरडीएने अनेक अडचणींवर मात करून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. हा 58 किलोमीटरचा कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर तो भारतातील सर्वात मोठा उन्नत मेट्रो मार्ग ठरणार आहे आणि त्याचा फायदा दररोज 21 लाखांहून अधिक प्रवाशांना होणार आहे."*
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) म्हणाले –
*"ठाणेकरांसाठी हा प्रकल्प म्हणजे केवळ प्रवासाची सोय नसून सामाजिक व आर्थिक प्रगतीचे नवे पर्व आहे. मेट्रो मार्ग 4 आणि 4अ हा ‘मुंबई इन मिनिट्स’ या दूरदर्शी संकल्पनेला गती देणारा आहे. या मार्गिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, सुरक्षिततेसाठी स्वयंचलित अग्निशमन शोध प्रणाली, अडथळा शोध उपकरण, प्रवासी आपत्कालीन संपर्क यंत्रणा, तसेच पुनरुत्पादक ब्रेकिंग प्रणालीसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई शहर व ठाणे शहरातील पूर्व-पश्चिम जोडणी अधिक मजबूत होणार असून, प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. डेपोच्या माध्यमातून चार मेट्रो मार्गांचे एकत्रित संचालन होणार आहे, ज्यामुळे संपूर्ण नेटवर्क कार्यक्षमतेने चालवता येईल. या मार्गावर आठ डब्यांच्या गाड्या धावणार असून दररोज लाखो प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. एमएमआरडीएने या कामाला तांत्रिक व वैधानिक दृष्ट्या सक्षम बनवले आहे आणि सर्व मंजुरीनंतर आम्ही हा मार्ग ठाणेकर व मुंबईकरांसाठी लवकरच खुला करू. हा मेट्रो प्रकल्प ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेतील ऐतिहासिक क्रांती ठरणार आहे."*