वसई विरार पूर मुक्तीसाठी महापौरांचा प्रशासकीय पाठपुरावा - Vasai live Marathi news
Notice
Loading notice...
🔴 ताज़ा खबरें लोड हो रही हैं...

Monday, 4 May 2026

वसई विरार पूर मुक्तीसाठी महापौरांचा प्रशासकीय पाठपुरावा

 


*वसई-विरार पूरमुक्तीसाठी महापौरांचा प्रशासकीय पाठपुरावा!*


 *ठाणे महापालिका आयुक्तांकडून पत्राची

 दखल!*


प्रतिनिधी 


विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या भीषण पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर अजीव पद्मावती यशवंत पाटील यांनी सुरू केलेल्या मोहिमेला यश येताना दिसत आहे. या गंभीर समस्येबाबत महापौरांनी १० एप्रिल २०२६ रोजी ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्राची प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली असून, त्यावर तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे उपआयुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी २० एप्रिल २०२६ रोजी महापौरांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कळवा खाडीचे पात्र अरुंद झाल्यामुळे वसई-नायगाव परिसरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत आणि त्यावरील तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतच्या मागणीचे ठाणे महापालिका आयुक्तांनी स्वतः अवलोकन केले आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी हे प्रकरण आता तातडीने अतिरिक्त आयुक्त-२ यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.


याच पाठपुराव्याचा एक भाग म्हणून, महापौर अजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर नारायण मानकर आणि स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांच्या शिष्टमंडळाने २७ एप्रिल २०२६ रोजी कोकण भवन येथे विभागीय आयुक्तांचीही भेट घेतली होती. या बैठकीत महापौरांनी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठाणे, कळवा आणि वसई खाडी पात्रातील साचलेला गाळ उपसून खोली वाढवण्याची आग्रही मागणी केली होती. खाडीतील या गाळामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा निर्माण होतो आणि कळवा खाडीपात्रालगत झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे वसई- विरार शहरात पुराचा हा धोका अधिकच वाढत असल्याचे महापौरांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. यावर विभागीय आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.


दरम्यान; वसई-विरारमधील नागरिकांना पुराच्या संकटातून मुक्त करणे ही आपली प्राथमिकता असून, केवळ तात्पुरत्या दुरुस्त्या न करता दीर्घकालीन तांत्रिक उपाययोजना करण्यावर आपण ठाम असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

***

Home Admin Contact About
Home Admin Contact About