*शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चांगल्या सूचनांचे सदैव स्वागतच!*
*महापौर अजीव पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद*
*वसई-विरार शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर जनशक्ती आघाडीच्या शिष्टमंडळासोबत महापौरांची महत्त्वपूर्ण चर्चा*
प्रतिनिधी
विरार : वसई-विरार शहराचा संतुलित विकास साधण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या हितासाठी येणाऱ्या चांगल्या संकल्पना आणि विधायक सूचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करू. आमच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक योग्य सूचनेची महानगरपालिका नक्कीच अंमलबजावणी करेल, असे आश्वासक प्रतिपादन महापौर अजीव पाटील यांनी आज ( 6 मार्च) केले.
वसई-विरार जनशक्ती आघाडीच्या शिष्टमंडळाने आज महापौरांची भेट घेऊन शहरातील विविध ज्वलंत समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी महापौरांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत शिष्टमंडळाने मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेतली.
या बैठकीत शिष्टमंडळाने वसईतील स्थानिकांची घरे नियमित करणे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, डंपिंग ग्राउंडची समस्या आणि पावसाळ्यातील पूरस्थिती यांसारख्या गंभीर विषयांवर वस्तुस्थिती मांडली. यावर बोलताना महापौरांनी महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
विशेषतः 'नीरी-आयआयटी' अहवालाची अंमलबजावणी आणि धारण तलावांच्या निर्मितीबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
केवळ तक्रारी न मांडता, जनशक्ती आघाडीने सूचवलेल्या प्रभावी उपाययोजनांचे महापौरांनी स्वागत केले. "आपल्या शहराच्या विकासासाठी आपण चांगल्या कल्पना घेऊन कधीही आलात, तर आपले स्वागतच आहे," असे म्हणत महापौरांनी लोकसहभागातून शहर विकासाचा मंत्र दिला.
या महत्त्वपूर्ण चर्चेत वसई-विरार जनशक्ती आघाडीच्या वतीने मॅकेन्झी डाबरे, मिलिंद खानोलकर, डॉमणिका डाबरे, अनिल चव्हाण आणि कुमार राऊत यांनी सहभाग घेतला. या मान्यवरांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने विविध तांत्रिक आणि सामाजिक समस्या महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्या. महापौरांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे शहराच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
***
