UNESCO चा मानाचा तुरा वसईच्या शिरपेचात
UNESCO Asia-Pacific Awards for Cultural Heritage Conservation 2025 मध्ये पापडीतील Our Lady of Grace Cathedral ला ‘मेरिट’ पुरस्कार
वसई : इतिहास, श्रद्धा आणि परंपरेचा ४५२ वर्षांचा साक्षीदार ठरलेले पापडी येथील अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल आता जागतिक पातळीवर झळकले आहे. २०२५ च्या युनेस्को आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत या ऐतिहासिक चर्चला ‘मेरिट’ पुरस्कार जाहीर झाला असून, बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली.
सोळाव्या शतकातील पोर्तुगीज स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना असलेल्या या कॅथेड्रलच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे ४.७५ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता. विशेष म्हणजे, नूतनीकरण करताना सिमेंटऐवजी पारंपरिक चुन्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे वास्तूचे मूळ स्वरूप, श्वास आणि सौंदर्य अबाधित राखण्यात यश आले.
मुंबईतील सवानी हेरिटेज कॉन्सर्व्हेशन, गिरिज येथील सिक्वेरा फाइन आर्ट आणि स्थानिक कारागिरांच्या कुशल हातांनी २०२३-२४ दरम्यान हे संवर्धनकार्य पूर्ण झाले. गाभाऱ्यातील लाकडी कोरीवकाम, सूक्ष्म हस्तकला आणि पारंपरिक तंत्राचा जाणीवपूर्वक वापर यामुळे प्रार्थनास्थळ पुन्हा आपल्या जुन्या वैभवात नटले आहे.
युनेस्कोने आपल्या प्रशस्तीपत्रात नमूद केले की, “महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचा हा एक जिवंत पुरावा असून, पारंपरिक कारागिरीच्या माध्यमातून या वास्तूचे केलेले जतन अत्यंत कौतुकास्पद आहे.”
२००० पासून दरवर्षी युनेस्कोकडून आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील उत्कृष्ट संवर्धन प्रकल्पांना गौरविले जाते. यंदा या पुरस्काराला २५ वर्षे पूर्ण झाली असून, १६ देशांमधून आलेल्या ९० नामांकनांतून दहा प्रकल्पांची निवड करण्यात आली.
यंदाचा सर्वोच्च ‘Award of Distinction’ सन्मान जपानमधील ओडा येथील ‘इवामी गिन्झान ग्रंथालय’ आणि चीनमधील शांघाय येथील ‘सिहांग वेअरहाऊस’ प्रकल्पांना मिळाला. या पार्श्वभूमीवर वसईतील कॅथेड्रलचा समावेश होणे, ही शहरासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
“हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमान”
यावेळी प्रमुख धर्मगुरू फादर जॉन फर्गोस म्हणाले,
“वसईतील अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलची या पुरस्कारासाठी निवड होणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. युनेस्कोच्या पुरस्कारांमध्ये हे एकमेव प्रार्थनास्थळ आहे. चर्चाचा झालेला हा सन्मान प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
श्रद्धा, संस्कृती आणि समुदायाचा संगम
वाढते शहरीकरण आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक समुदाय, कारागीर आणि तज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नांतून वारसा जपण्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
वसईच्या भूमीत उभ्या असलेल्या या ऐतिहासिक वास्तूने केवळ दगड-माती नव्हे, तर श्रद्धा, इतिहास आणि परंपरेचा वारसा जपला आहे. आता या वारशाला जागतिक मान्यता मिळाल्याने वसईकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वसईचा अभिमान… भारताचा सन्मान! 🇮🇳

