*वविशमपा काँग्रेस नगरसेविकेची प्रदेशाध्यक्षांसोबत भेट*
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत निर्मळ- नंदाखाल- गास विभागातून काँग्रेस पक्षाच्या सौ. सॅरल डाबरे ह्या १३ब प्रभागातून विजयी झाल्या. त्यामुळे उत्तर वसईत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधानसभेत काँग्रेस उमेदवाराला या प्रभागातून मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. या भागात कार्यरत असलेले प्रदेश सचिव रुपेश रॉड्रीग्ज यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. कारण या प्रभागाचे उमेदवार व प्रचाराची धुरा आदि जबाबदार्या त्यांच्यावर होत्या. ह्या जबादार्या यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे सौ. डाबरे ह्या मोठ्या मताधिक्याने (4509) विजयी झाल्या आहेत.
नवनिर्वाचित नगरसेविका डाबरे व प्रदेश सचिव रॉड्रीग्ज यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब ह्यांची टिळक भवन येथे भेट घेतली. तद्नंतर कोकण विभागीय आयुक्तांकडे वसई विरार महापालिकेसाठी स्वतंत्र गटाची नोंदणी करण्यात आली. गटनेते पदी सॅरल डाबरे यांची निवड करण्यात आली.
इतर चिन्हावर निवडून आलेल्या इतर 5 नगरसेवकांना काँग्रेस गटात लवकरच समाविष्ट केले जाणार आहे, त्यासाठी जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा हे प्रयत्नशील आहेत.
२९गावांचा प्रश्न, ग्रामीण भागातील FSI बाबत धोरण, पश्चिम भागातील घरे नियमित करण्याबाबत, घरोघरी नळाचे पाणी, काँक्रिट रस्ते व गटारे, नियमित बससेवा, पावसाळी पाण्याचा निचरा, सांडपाण्याचे नियोजन, सुशोभीकरण या सर्व कामांसाठी पाठपुरावा केला जाईल व नागरिकांच्या समस्यांबाबत सभागृहात व सभागृहाबाहेर काँग्रेस पक्षाच्या वतीने वेळोवेळी आवाज उठवला जाईल असे प्रदेश सचिव रुपेश रॉड्रीग्ज यांनी सांगितले.
