वसई-विरार शहर महानगरपालिका
दिव्यांग कल्याण विभाग
दि.०४/१२/२०२५
*वसई विरार शहर महानगरपालिकेत “जागतिक दिव्यांग दिन” निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न*
“जागतिक दिव्यांग दिनाचे” औचित्य साधून वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत दि.०४ डिसेंबर २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात “जागतिक दिव्यांग दिन” विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महानगरपालिकेतर्फे आयोजित या विशेष कार्यक्रमाला दिव्यांग विद्यार्थी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“जागतिक दिव्यांग दिन” हा दिवस समाज आणि विकासाच्या प्रत्येक स्तरांवर दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या परिस्थितीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आहे. याच प्रेरणेने वसई विरार शहर महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभागामार्फत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिव्यांग बांधवांमार्फत स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मा.अतिरिक्त आयुक्त श्री.दीपक सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.
कार्यक्रमास उपस्थित मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले कि, वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात. महानगरपालिकेने दि.२४ नोव्हेंबर रोजी दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात अनेक दिव्यांग व्यक्तींना विविध कंपन्यांमार्फत रोजगाराची संधी मिळाली. दिव्यांगांना रोजगाराची संधी दिल्याबद्दल सदर कंपन्यांचेही मा.आयुक्त महोदयांनी आभार मानले. दिव्यांगांसाठी महानगरपालिका क्षेत्रात दिव्यांग पार्क उभारण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे मा.आयुक्त महोदयांनी यावेळी सांगितले.
यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांमार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये गतिमंद, मतीमंद, कर्णबधीर विद्यार्थ्यांमार्फत नृत्य, मूकनाट्य सादर करण्यात आले तसेच श्रवणकुमार (दिव्यांग) यांच्या मार्फत विविध गाणी सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. तसेच कार्यक्रमात श्रीमती अनुसया प्रधान, मुख्याध्यापक सूर्योदय ट्रस्ट यांच्यामार्फत जाणीव जागृती व्याख्यान सादर करण्यात आले.
या कार्यक्रमास मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.), मा.अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, मा.उप-आयुक्त श्रीमती स्वाती देशपांडे, प्र.शहर अभियंता श्री.प्रदीप पाचंगे, सहा.आयुक्त श्रीम.नीलाक्षी पाटील, दिव्यांग विभाग समन्वयक श्रीम.रुपाली कदम, विविध दिव्यांग संस्थाचे पदाधिकारी, दिव्यांग शाळांचे शिक्षक, दिव्यांग नागरिक, पत्रकार, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन श्री.बिपीन वर्तक (दिव्यांग) यांनी केले तसेच आभार प्रदर्शन मा.उप आयुक्त श्रीम.स्वाती देशपांडे यांनी केले.


