*अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला गणेशभक्तांचा भावपूर्ण निरोप ;*
*महानगरपालिकेच्या उत्तम नियोजनामुळे भरपावसातही विसर्जन सुरळीतपणे संपन्न*
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी दि.०६ सप्टेंबर रोजी गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. शनिवारी २६२३ घरगुती व ४२४ सार्वजनिक अशा एकूण ३०४७ गणरायांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी १८९३ घरगुती व २६१ सार्वजनिक अशा एकूण २१५४ मूर्तींचे विसर्जन हे पालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले. विसर्जनस्थळी महानगरपालिकेने केलेले चोख नियोजन व भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोईसुविधा यामुळे विसर्जन सोहळा भरपावसातही शिस्तबद्ध, जल्लोषात व भक्तीमय वातावरणात सुरळीत पार पडला.
मा.आयुक्त श्री.मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त श्री.संजय हेरवाडे व श्री.दिपक सावंत यांच्या देखरेखीखाली महानगरपालिकेमार्फत यावर्षी मूर्ती विसर्जनासाठी एकूण ११६ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून सहा जेट्टींच्या ठिकाणी व दोन बंद दगडखाणींच्या ठिकाणीही विसर्जनाची सोय करण्यात आली होती. प्रत्येक प्रभागात २ फिरते हौद याप्रमाणे मूर्ती विसर्जनासाठी ९ प्रभागांमध्ये १८ फिरते हौद उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी नागरिकांच्या सोयीसाठी मंडप व्यवस्था, आरती स्थळे, दिवाबत्ती सोय, मूर्ती संकलन केंद्र, निर्माल्य कलश, वैद्यकीय मदत कक्ष, इ.आवश्यक सर्व उपाययोजना महानगरपालिकेमार्फत करण्यात आल्या होत्या.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक आणि घरगुती गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध स्वयंसेवक यांच्या उत्तम नियोजनामुळे विसर्जन मिरवणुका तसेच विसर्जन सुरळीतरित्या पार पडले. महानगरपालिकेचे साडेतीन हजारांहून अधिक मनुष्यबळ विसर्जनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने ६ जेटीच्या ठिकाणी विशेष तयारी बरोबर बोटी आणि तराफे यांची व्यवस्था केली होती. तसेच २ बंद दगड खाणींच्या ठिकाणी विसर्जनासाठी कन्व्हेअर बेल्टची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली होती. कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने विसर्जन करणे अधिक सोयीस्कर ठरले, वेळेची बचत झाली आणि कमी मनुष्यबळात विसर्जन पार पडले. विसर्जनाच्या ठिकाणी अग्निशमन विभागामार्फत बचाव साहित्यासह जीवरक्षक ही नेमण्यात आले होते. विसर्जन ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे ही बसविण्यात आले होते. किल्लाबंदर जेटी येथे विसर्जनासाठी जाण्या-येण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विसर्जनावेळी महानगरपालिकेमार्फत नरवीर चिमाजी अप्पा स्मारक ते किल्लाबंदर जेटी पर्यंत मोफत बस सेवा पुरविण्यात आली होती. विसर्जनादरम्यान संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येत असून महिला बचत गटांच्या सहकार्याने खतनिर्मितीची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
महानगरपालिकेची तसेच पोलीस विभागाची यंत्रणा विसर्जनाच्या ठिकाणी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भरपावसातही तत्परतेने कार्य केले. स्वत: मा.आयुक्त महोदय, महानगरपालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त, महानगरपालिकेचे सर्व उप-आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, अग्निशमन कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा दलाचे कर्मचारी व इतर कर्मचारी वर्गाने प्रभागनिहाय विसर्जन स्थळी हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. तसेच बांधकाम विभागामार्फत अत्यंत कमी कालावधीत रस्त्याच्या डागडुजीचे काम करण्यात आले.ज्यामुळे विसर्जनावेळी वाहने नेताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. या कामात प्र.शहर अभियंता श्री.प्रदीप पाचंगे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, उप अभियंता सतीशकुमार सूर्यवंशी व बांधकाम अभियंत्यांनी लक्षपूर्वक काम केले.
तसेच वाहन विभागानेही विसर्जनाच्या कामासाठी लागणारी सर्व वाहने वेळेत पुरवून विसर्जन सुव्यवस्थितरित्या पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भांडार विभागानेही कृत्रिम तलाव तयार करणेचे कामात तसेच विसर्जन स्थळी विविध उपाययोजना पुरविणे बाबत महत्त्वाची भूमिका बजावली.
*कृत्रिम तलावांना उत्तम प्रतिसाद; एकूण विसर्जनाच्या ७९ टक्के विसर्जन कृत्रिम तलावात*
वसई विरार शहर महानगरपालिकेतील गणेशभक्तांनी महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला. गणेशोत्सवात काळात दीड दिवसीय, पाच दिवसीय, सात दिवसीय गणपती गौरी आणि अनंत चतुर्दशी या विसर्जनादरम्यान ३१३५७ घरगुती व १५२० सार्वजनिक अशा एकूण ३२८७७ मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी २४८८१ घरगुती व १०५९ सार्वजनिक अशा एकूण २५९४० मूर्तींचे विसर्जन हे पालिकेच्या कृत्रिम तलावात करण्यात आले. म्हणजेच एकूण विसर्जनापैकी ७९ टक्के मूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये झाले.
महानगरपालिकेमार्फत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेच्या अनुषंगाने मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत महानगरपालिकेत यशस्वीरित्या पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला, याबद्दल महापालिकेचे आयुक्त मा.श्री.मनोजकुमार सूर्यवंशी(भा.प्र.से.) यांनी मा.लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक, गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवक व पत्रकार बंधु यांचे आभार मानले.