*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली धोकादायक रासायनिक कारखान्यांच्या प्रदूषण व सुरक्षा उपाययोजनांबाबत बैठक संपन्न*
पालघर दि. ५ सप्टेंबर : पालघर जिल्ह्यातील धोकादायक व अतिधोकादायक रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमधील प्रदूषण नियंत्रण, कामगारांची सुरक्षा व आपत्कालीन उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.
यावेळी आमदार राजेंद्र गावित यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे. जिल्ह्यातील उद्योग व्यावसायिक , जिल्ह्यातील तहसीलदार (दूरदुष्य प्रणाली द्वारे )उपस्थित होते.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध रासायनिक कारखान्यांचे भोगवटादार, व्यवस्थापक, प्रतिनिधी तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, कामगार उपआयुक्त आणि संलग्न प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी रासायनिक कारखान्यांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कामगारांना नियमित प्रशिक्षण, कार्यशाळा, तसेच रंगीत तालीम (Mock Drill) आयोजित करण्याचे आणि प्रत्येक कामगार आपत्कालीन परिस्थितीत सक्षमपणे प्रतिसाद देईल याची खात्री करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रासायनिक कारखान्यांमध्ये होऊ शकणाऱ्या वायुगळती, आग, स्फोट व प्राणघातक अपघात टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना व सुरक्षा पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी नियमित सुरक्षा लेखापरीक्षण, प्रशिक्षण व रंगीत तालीम अनिवार्यपणे राबविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले
कामगार उपआयुक्त, पालघर यांनी कारखान्यांतील कामगारांच्या कौशल्य विकास (Core Competency Development) संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यांनी कामगार सक्षम व प्रशिक्षित झाल्यास अपघातांची शक्यता कमी होईल व उद्योगक्षेत्र सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सक्षम होईल .जिल्ह्यातील सर्व रासायनिक कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण, सुरक्षा उपाययोजना, नियमित प्रशिक्षण व रंगीत तालीम यावर अधिक भर देऊन कामगारांची सुरक्षितता व उद्योगांची जबाबदारी याची जाणीव ठेवून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.
बैठकीत उपस्थित सर्व कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सुरक्षा व प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले .
---

