*मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी सायमन मार्टिन यांची निवड!*
नाशिक येथे ९,१० आणि ११ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होत असलेल्या २७व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन, वसई यांची निवड झालेली आहे. दिनांक २० सप्टेंबर रोजी अहिल्यानगर येथील बिशप हाऊस मध्ये संपन्न झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये ही घोषणा करण्यात आली
सायमन मार्टिन सर हे मराठीतील आजचे महत्वाचे ज्येष्ठ कवी असून, आपल्या लेखनाची आणि जगण्याची भूमिका एकच असते असा ठाम विचार मांडणाऱ्या या कविची कविता समकाळावरील अनिष्ट घटनांवर प्रहार करताना आजचे माणसा माणसात भेद करणारे वास्तव अधिक तीव्रपणे मांडते.
वसई येथून प्रसिद्ध होणाऱ्या सुवर्ता मासिकाचे २५ वर्षे सहसंपादक म्हणून कार्य केलेले मार्टिन हे येथील सहयोग संस्थेचे संचालक असून त्यांचे एकूण १६ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. 1993 साली साधना सारख्या अग्रगण्य प्रकाशनाने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आणि त्यांची कविता सर्व दूर पोहोचली. मान्यवर अभ्यासकानी त्यांच्या कवितेची दखल घेतली. त्यांना राज्य शासनापासून अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळालेले असून त्यांच्या कवितांचा हिंदी, इंग्रजी व जर्मन भाषेत अनुवाद झालेला आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठात त्यांच्या तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर या कवितासंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. लेखनाबरोबरच सामाजिक चळवळी बरोबर ते चार दशकापासून जोडलेले असून वसई येथील हरित वसई संरक्षण समितीचे ते संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीने सर्व थरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.