गुन्हे शाखेची धडक कारवाई : दोन जणांकडून बनावट देशी दारू तयार करण्याचा प्रकार उघड, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
वसई :
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी) केलेल्या कारवाईत दोन जणांकडून बनावट देशी दारू तयार करण्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत पोलिसांनी बनावट दारू तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने, साहित्य, दारूचे ड्रम, रबराची हौदे, तसेच तयार दारूसह सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखा युनिट-२, वसई (पूर्व) येथील पोलिस पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तुळिंज गावातील पांडू शेडकर यांच्या शेतामध्ये बनावट देशी दारू तयार करण्याचे अड्डे सुरु असल्याची खात्री करून छापा टाकला.
कारवाईदरम्यान पोलिसांना ठिकाणी १०० लिटर तयार गावठी दारू, २०० लिटर हाफस्पिरिट (ज्वलनशील रसायन) तसेच १६ ड्रममध्ये २८०० लिटर केमिकल सापडले. याशिवाय ३ ड्रम रिकामे, २ प्लास्टिकच्या टाक्या, २ स्टीलच्या हौद्या, २ लाकडी टोपल्या अशा मोठ्या प्रमाणात साहित्य देखील पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकारात ५० वर्षीय शंकर रामा पाटील (रा. नालासोपारा पूर्व, ता. पालघर) व ३६ वर्षीय सुरेश मनोज पाटील (रा. नालासोपारा पूर्व, ता. पालघर) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी मोठ्या प्रमाणावर बनावट गावठी दारू तयार करून परिसरात विक्रीसाठी पुरवठा करत होते. या दारूमुळे मानवी जीविताला गंभीर धोका संभवत होता.
या धडक कारवाईत पोलीस उपआयुक्त रामनाथ सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त पो.उप.नि. संजीव पांडुरंग गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तुळिंज येथे बनावट गावठी दारूचा कारखाना उघड
१०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
२ आरोपी अटकेत
परिसरातील जनतेच्या आरोग्यास गंभीर धोका टाळला